चेंबूर वाशी नाका येथील ममतादीप हाईट्स या इमारतीमध्ये शॉर्ट सर्किट मुळे भीषण आग अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे सुदैवाने जीवित हानी टळली.

Spread the love

मुंबई (८ जुलै) – वाशी नाका परिसरातील ममता दीप हिट्स को-ऑप हाऊसिंग सोसायटीत रविवारी सकाळी सुमारे १० वाजता वीज मीटर बॉक्समध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याची घटना घडली. या आगीत संपूर्ण इमारतीतील वायरिंग जळून खाक झाले असून, संपूर्ण सोसायटी अंधारात गेली आहे. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

चौथ्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न टळला

आग लागल्याच्या वेळी संपूर्ण इमारतीमध्ये एकच गोंधळ उडाला. धुरामुळे घाबरलेल्या चौथ्या मजल्यावरील रहिवासी सुचित गावंड (वय ५५) यांनी खिडकीतून उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, आजूबाजूच्या लोकांनी प्रसंगावधान राखून त्यांच्याशी संवाद साधत त्यांना थांबवले आणि काही वेळात अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन त्यांना सुरक्षित बाहेर काढले.

अग्निशमन आणि पोलिस यंत्रणेचे तातडीने प्रतिसाद

मुंबई अग्निशमन दल आणि आरसीएफ पोलीस ठाण्याचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. प्रत्यक्षदर्शी अयुब खान यांनी सांगितले की, “आग इतकी भीषण होती की संपूर्ण वायरिंग जळत असल्याचे स्पष्ट दिसत होते. लोकांमध्ये घबराट पसरली होती.”

बीपीसीएल रिफायनरीपासून फक्त १० मीटर अंतरावर

विशेष म्हणजे ही इमारत भारत पेट्रोलियम रिफायनरीपासून अवघ्या १० मीटर अंतरावर आहे. त्यामुळे भविष्यातील धोके लक्षात घेता या घटनेचे गांभीर्य अधिकच वाढते.

वीज व पाण्याचा अभाव, जनरेटरचा तात्पुरता उपाय

सध्या संपूर्ण इमारत वीजविहीन झाली असून, पाणीपुरवठाही विस्कळीत झाला आहे. त्यामुळे रहिवाशांनी जनरेटरचा वापर सुरू केला आहे. याशिवाय, मुंबई पोलिसांचे काही वरिष्ठ अधिकारीही याच इमारतीत राहतात, त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीनेही ही घटना चिंताजनक मानली जात आहे.

कार्यकारिणीवर निष्काळजीपणाचा आरोप

या दुर्घटनेमागे सोसायटी कार्यकारिणीच्या दुर्लक्षाची शक्यता रहिवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे. रहिवासींच्या म्हणण्यानुसार, चेअरमन दिलीप शिवराम यादव, सेक्रेटरी स्वराली जितेंद्र लिमका आणि खजिनदार धर्मा देसले यांनी वेळोवेळी वायरिंगच्या देखभालीकडे दुर्लक्ष केल्यामुळेच हा शॉर्ट सर्किटचा प्रकार घडला असावा.

पुढील तपास सुरू

आरसीएफ पोलीस आणि महावितरणचे अधिकारी या आगीच्या कारणांचा सखोल तपास करत असून, इमारतीतील सुरक्षिततेच्या उपाययोजनांचीही नव्याने पाहणी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मुख्य संपादक सतीश नलावडे
न्यूज 18 जनमत वृत्तवाहिनी📡
डिजिटल युगाचे डिजिटल बातमीपत्र.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *